मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा शासन निर्णय जारी, विशेष मोहीम राबवून देणार प्रमाणपत्रे

0
176
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा समाजाला (एसईबीसी) खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय काही तासांतच जारी करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया खोळंबल्या होत्या. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेत खोळंबलेल्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता होती.

मराठा समाजातील अस्वस्थता दूर करण्यासाठी बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभ देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही तासातच सामान्य प्रशासन विभागाने मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय जारी केला.

 ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी विषेश मोहीम राबवून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. यासाठी विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्यादृष्टीने प्रमाणपत्र प्राधान्याने देण्याची आवश्यक कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा