भीमा कोरेगाव शौर्यदिनी विजयस्तंभाजवळ गर्दी, जाहीर सभा, पुस्तकांचे स्टॉल लावण्यास बंदी

0
214
संग्रहित छायाचित्र.

पुणेः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तभांवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या गृह विभागाने गाइडलाइन्स जारी केल्या असून नागरिकांना गर्दी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या परिसरात जाहीर सभा घेण्यास आणि खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल लावण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी रोजी राज्यभरातून दरवर्षी लाखो नागरिक येतात. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने हा कार्यक्रम सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी व कार्तिकी वारी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद हे सणही साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. त्याच धर्तीवर गृह विभागाने सूचना जारी केल्या आहेत.

भीमा कोरेगाव अभिवादन कार्यक्रमासाठी जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार, १ जानेवारी रोजी या ठिकाणी गर्दी करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि अन्य समाजमाध्यमांद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा आजूबाजूच्या परिसरात जाहीर सभा घेण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच या परिसरात खाद्य पदार्थ आणि पुस्तकांचे स्टॉल लावण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचे विविध संघटनांनी समर्थन केले असून राज्यातील नागरिकांनी विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा