‘स्ट्रेट फॉर्वर्ड’ संजय पांडे करणार परमबीर सिंगांची चौकशी, महाविकास आघाडीचा जोर का झटका!

0
497

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप लावून त्यांना गोत्यात आणणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना ‘टप्प्यात हेरून’ मारण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली असून नुकताच पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे परमबीर सिंग यांची चौकशी करणार आहेत. राज्याच्या गृह विभागाने तसे आदेशच जारी केले असून त्यामुळे परमबीर सिंग चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून आपल्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. असा खळबळजनक आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला होता. परमबीर सिंगांच्या आरोपांमुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलाया या निवासस्थानाशेजारी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यानंतर एनआयएने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सीआययू शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले होते. त्या फेरबदलात परमबीर सिंग यांची मुंबईच्यो पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. ही बदली करण्यात आल्यानंतर पमरबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.

आता महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे महासंचालक संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे. हा पदभार सोपवल्यानंतर लागलीच परमबीर सिंग यांच्या चौकशीची जबाबदारी संजय पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

१९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय पांडे हे प्रामाणिकपणा आणि सचोटीबद्दल ओळखले जातात. स्ट्रेट फॉर्वर्ड असलेले संजय पांडे हे गेली अनेक वर्षे साइड पोस्टिंगवर फेकले गेले होते. सेवा ज्येष्ठतेनुसार ते सर्वात वरिष्ठ अधिकारी असूनही त्यांना साइड पोस्टिंगचा ‘वनवास’ भोगावा लागला होता. त्याबद्दल त्यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती.

महाविकास आघाडी सरकारने शुक्रवारी संजय पांडे यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवला. हा पदभार सोपवल्यानंतर राज्याच्या गृह खात्याने पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर परमबीर सिंग यांची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसे आदेशही जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. संजय पांडे हे ज्या ‘प्रामाणिकपणा आणि सचोटी’बद्दल ओळखले जातात, ते त्याच प्रामाणिकपणे आणि सचोटीने परमबीर सिंग यांची चौकशी करतील, अशी अपेक्षा असल्यामुळे परमबीर सिंगांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचाः महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार संजय पांडे यांच्याकडे!

परमबीर सिंग यांच्याबाबत मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकताच राज्याच्या गृह विभागाला पाच पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार परमबीर सिंग यांच्या आग्रहाखातरच निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस दलात सामावून घेण्यात आले आणि त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अत्यंत महत्वाच्या अशा सीआययू विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते. सचिन वाझे हे पदानुक्रम डावलून अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांऐवजी परमबीर सिंग यांना थेट रिपोर्टिंग करत होते, असेही या अहवालात म्हटले आहे. या अहवालाच्या आधारावरच आता गृह विभागाने संजय पांडे यांना परमबीर सिंगांची चौकशी करण्यास सांगितले आहे.

परमबीर सिंग यांनी लिहिलेले वसुलीचे पत्र, कायदेशीर तक्रार आदी गोष्टींमध्ये खाते निहाय नियमांचा भंग झाला आहे का? सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांचा नेमका सहभाग काय आहे?  या बाबींबरोबरच मुंबई पोलिसांनी अहवालात दिलेली माहितीची पडताळणी आदी बाबींची चौकशी संजय पांडे हे करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा