ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर: शिवसेनेकडे गृह, काँग्रेसकडे महसूल तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालय

0
269
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारचे पंधरवडाभर लांबलेले खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते जयंत पाटील यांना अर्थमंत्रिपद तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अपेक्षेप्रमाणे महसूल मंत्रिपद देण्यात आले आहे. ज्या मंत्र्यांकडे कोणतेही नेमून दिलेले खाते किंवा विशिष्ट विभाग नसेल त्या सर्व खाते आणि विभागांची जबाबदारी तूर्तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे. साडेतीन दिवसांचे देवेंद्र फडणवीस सरकार कोळसल्यानंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती.मात्र खातेवाटप लांबले होते. नागपूर येथे होऊ घातलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मंत्री आणि त्यांना मिळालेली खाती अशीः

1. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीः कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.

2. जयंत पाटीलः वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

3. बाळासाहेब थोरात: महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

4. छगन भुजबळः ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

5. एकनाथ शिंदेः गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

6. सुभाष देसाईः उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

7. डॉ. नितीन राऊतः सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा