मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध मराठा संघटनांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत परीक्षा झालीच तर परीक्षा केंद्रे फोडण्याचा इशारा दिला होता. या परीक्षेला राज्यभरातून २ लाख ६० हजार विद्यार्थी बसणार होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर रोजी एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे आम्ही सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळाला पाहिजे, हा विचार करून आम्ही ही परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा कधी होईल, याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.
हेही वाचाः वेळ पडल्यास तलवार उपसूः संभाजीराजेंचा इशारा; कुणाविरोधात उपसणार?: वडेट्टीवारांचा थेट सवाल
एमपीएससी परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. या पुढे परीक्षेची जी तारीख ठरेल, त्या तारखेत बदल केला जाणार नाही. आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत, तेच विद्यार्थी यापुढे जेव्हा परीक्षा होईल, तेव्हाही पात्र राहतील. पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी ११ ऑक्टोबरच्या परीक्षेला बसलेला एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे ११ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र या पुढे जी तारीख जाहीर केली जाईल, त्यात बदल होणार नाही, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाकडूनही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.