निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी प्रशासनाची सज्जता, एनडीआरएफच्या १० तुकड्या तैनात

0
122
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.   

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

कच्चा घरातील लोकांचे स्थलांतरः ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलवण्यात आले असून तटरक्षक दलालाही सूचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 मंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्षः चक्रीवादळाच्या संकटावेळी वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयातही २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालये उपलब्धः मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविडसाठी तात्पुरते उभारलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.  

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा