वीज ग्राहक आमचे दैवत, वीज बिलमाफीबाबत राज्य सरकार गंभीरचः ऊर्जामंत्री राऊतांचा शब्द

0
42
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लॉकडाऊन काळात नागरीकांना आलेल्या वाढीव बीलावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टिकेची झोड उठत असताना उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. वीज ग्राहक हे आमचे दैवत आहेत. आम्ही त्या ग्राहकांचे कधीच नुकसान करणार नाही. वीज बिलमाफीबाबत सरकार गंभीर आहे. राज्यातील जनतेला १०० युनिटपर्यंतच्या वीज वापराला माफी देण्याच्या घोषणेवर मी अद्यापही ठाम आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल अपेक्षित आहे, असे राऊत यांनी सांगितले. आधीच्या भाजप सरकारने केलेले पाप धुतल्यानंतरच वीजबील माफीचा निर्णय घेण्यात येईल, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, वीजबीलांसाठी आंदोलन  करणाऱ्या भाजपाने आधी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे असा टोलाही राऊत यांनी लगावला.

कृषिपंप वीज जोडणीच्या नव्या धोरणाला गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणाची माहिती देण्यासाठी राऊत यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात वाढीव वीजबीलाबाबत मनसे आणि भाजपने आंदोलन सुरु केले आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर आहे. वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीज ग्राहक हा आमचा देव आहे. आम्ही त्या ग्राहकाचे नुकसान आम्ही करणार नाही. १०० युनिटपर्यंत वीजग्राहकांना माफी देण्याच्या मुद्यावर आपण आजही ठाम आहोत. याबाबत एक समितीही आपण नेमली होती. मात्र कोरोनाकाळात त्या समितीच्या बैठका झाल्या नाहीत, असे राऊत म्हणाले.

केंद्राने जीएसटीचे २८ हजार कोटी दिले तर वीज बिलात सवलतः  मी केंद्र सरकारला वारंवार पत्र लिहून उर्जाविभागासाठी १० हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. जीएसटीपोटी राज्याच्या हिश्श्याचे २८ हजार कोटी रूपये देखील अद्यापही केंद्र सरकारने दिलेले नाहीत. ते जर मिळाले तर वीजबीलात सवलत देण्यास आम्हाला सोयीचे जाणार आहे, असे सांगतानाच वीजबीलासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्यांनी आधी केंद्र सरकारविरोधात आंदोलने करावीत असा टोलाही राऊत यांनी लगावला.

थकबाकीच्या डोंगराची होणार चौकशीः आधीच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात महावितरणची थकबाकी ५९ हजार १४९ कोटींपर्यंत पोहोचली आहे. भाजप सरकारचे पाप धुण्याचेच काम आधी आम्हाला करावे लागणार आहे. त्यानंतर वीजबील माफीचा निर्णय आम्ही निश्चितच घेणार आहोत. महावितरणवर ५९ हजार कोटींच्या थकबाकीचा जो डोंगर भाजप सरकारच्या कार्यकाळात उभा राहिला आहे त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत असेही राऊत यांनी सांगितले.

तर भाजपा नेत्यांनी बीले भरावीः आतापर्यंत ६९ टक्के वीजग्राहकांनी आपली बिले भरली आहेत. उर्वरित ३१ टक्के ग्राहकांची देखील येत्या डिसेंबर, जानेवारीपर्यंत बिले येतील. भाजप नेत्यांना जर वाढीव बिलांबाबत आक्षेप असेल तर त्यांनी माझ्या कार्यालयाकडे ती दयावीत. मी त्यांची तपासणी करेन. पण जर वाढीव बिले नसल्याचे सिद्ध झाले तर ती भरू असा शब्द भाजप नेत्यांनी आपल्याला द्यावा असे आव्हानही राउत यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा