कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकार स्वतंत्र एसआयटी नेमणार

0
66
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरण आणि एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने परस्पर एनआयएकडे सोपवला असला तरी राज्य सरकार या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र विशेष तपास पथक ( एसआयटी) नेमणार आहे. एसआयटीची नियुक्ती करणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील चर्चेनंतर एसआयटीचा निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व १६ मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यामुळे शरद पवार नाराज आहेत. केंद्र सरकारला या प्रकरणातील काही तरी लपवायचे असल्यामुळेच तपास एनआयएकडे सोपवल्याचा आरोपही पवारांनी केला होता. त्यापार्श्वभूमीवर ही बैठक झाली. बैठकीनंतर मलिक म्हणाले की, एसआयटी स्थापन करणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच एसआयटीची स्थापना करण्यात येईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा