न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची ठोस पुराव्यांसह तक्रार आल्यास महाराष्ट्र सरकार पुन्हा चौकशी करणार

0
165
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरु होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. न्यायमूर्ती लोया यांचा 2014 मध्ये नागपूरमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा काही जणांचा दावा होता.

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती लोया आपल्या एका सहकाऱ्याच्या मुलीच्या विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले असता 1 डिसेंबर 2014 रोजी नागपुरात ह्रदयगती थांबल्याने मृत्यू झाला होता. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोपी होते. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूनंतर विशेष सीबीआय न्यायमूर्ती एम.बी. गोसावी यांनी या खटल्याची सुनावणी घेतली आणि त्यांनी शाह तसेच अन्य काही आरोपींना दोषमुक्त केले होते.

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत कोणी ठोस पुराव्यांसह तक्रार दाखल केल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बुधवारी रात्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीनंतर मलिक यांनी ही माहिती दिली. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी लोकांनी केल्यास ती पूर्ण करावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी) चौकशीची मागणी करणारी याचिका एप्रिल 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा