औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणारः मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत लेखी उत्तर

0
83
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात दिली.

औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर असे करण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या मुद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. भाजपने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात तुमचेच बहुमताचे सरकार असताना औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर का केले नाही, असा प्रतिप्रश्न शिवसेनेकडून भाजपला करण्यात आला होता.

विधानसभेत भाजप आमदाराने याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

कशी असते शहराच्या नामांतराची प्रक्रिया?: एखाद्या शहराचे नामांतर करायचे झाल्यास जिल्हाधिकारी तसा प्रस्ताव तयार करतात. तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला जातो. विभागीय आयुक्तांमार्फत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जातो. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाते आणि नंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो.

औरंगाबादच्या बाबतीत काय झाले?: औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण महाविकास आघाडीचा घटक पक्षांतच औरंगाबादच्या नामांतरावरून एकमत नाही. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या भावना लक्षात घेऊन नामांतराबाबत निर्णय घ्यायला हवा, अशी सावध भूमिका घेतलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा