केंद्राच्या परवानगीची वाट न पाहता लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण, ठाकरे सरकारचा निर्णय

0
206
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही. राज्यात लवकरच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल. प्रायोगिक तत्वावर घरोघरी लसीकरणाची सुरूवात पुण्यापासून करण्यत येईल, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्यासमोर खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय कळवण्यात आला.

घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी केंद्राच्या परवानगीची वाट बघणार नाही. केंद्राच्या परवानगीशिवायच राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल. प्रयोगिक तत्वावर या लसीकरणाची सुरूवात पुणे जिल्ह्यातून केली जाईल, अशी माहिती राज्याचे महाअधिवक्ता अनिल कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयास दिली. आम्ही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली होती. त्याच अनुभवाचा फायदा घेऊन ही लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या आकारामुळे प्रायोगिक तत्वावर लसीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा आकाराने फार मोठा नाही आणि फार छोटाही नाही. पुणे जिल्ह्यातच परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली होती. हा जुना अनुभव आणि पुणे जिल्ह्याचा आकार यामुळे पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचेही राज्य सरकारने न्यायालयात सांगितले.

आता ई-मेलवरही नोंदणीः ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांच्या कुटुंबीयांना आता ई-मेलच्या माध्यमातूनही नोंदणी करण्यात येणार आहे. राज्य सरकार लवकरच हा ई-मेल आयडी जारी करणार आहे. असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा