डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार; नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र, स्मारकही उभारणार

जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचाही निर्णय

0
135
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले जलसंस्कृतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शंकरराव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही घोषणा देऊन राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती आणली. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागले. दुष्काळमुक्तीसाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांचे कार्य व संकल्पनाचा प्रचार व प्रसार करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून, त्याचाच एक भाग म्हणून जलभूषण पुरस्कार दिले जाणार आहेत. या शिवाय जलक्रांती विषयक विचारांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संदर्भ ग्रंथ व लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन केले जाईल.

नांदेड शहरातील विष्णुपुरी प्रकल्पाजवळ स्व.डॉ. चव्हाण यांचे स्मारक उभारण्याचा आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड शहरात ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व मुला-मुलींचे वसतिगृह उभारणे आदी कामे देखील प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांच्या निधीसाठी संबंधित विभागांना आवश्यक ती तरतूद करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

डॉ. शंकरराव चव्हाण यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी झाला होता. 15 जुलै 2019 पासून 14 जुलै 2020 पर्यंत त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, यानिमित्त राज्य शासनाने हे निर्णय घेतले आहेत. विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मांडण्याची घोषणादेखील यापूर्वीच झालेली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा