महाराष्ट्रात ‘उद्धव’पर्वः बाळासाहेबांच्या स्मृतींनी बहरलेल्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदी ‘ठाकरे’ विराजमान!

0
45
छायाचित्र: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

मुंबईः प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या शिवतीर्थावर त्यांचे ‘बाळ’ महाराष्ट्राच्या ओटीत टाकले… ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची मुलुख मैदानी वर्षानुवर्षे धडाडली आणि ज्यांनी खर्‍या अर्थाने सत्तेचे विक्रेंद्रीकरण करून बहुजनांच्या घरात सत्ता पोहोचवली, तेच महाराष्ट्राचे महान नेते बाळासाहेब ठाकरे यांना ज्या शिवतीर्थावर अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच शिवतीर्थावर त्यांचे वारसदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आणि 36 दिवसांनंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा झाला आणि शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. ठाकरे हे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री आहेत.

 ठाकरे यांच्यासोबतच शिवसेनेचे विधिमंडळ एकनाथ शिंदे, ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि नागपूरचे आमदार नितीन राऊत या सहा कॅबिनेट मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आई-वडिलांचे स्मरण संविधानाला स्मरून शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जमलेल्या जनसमुदायासमोर नतमस्तक झाले. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने आजवर सत्तेचा रिमोट हाती ठेवणारे ठाकरे घराणे पहिल्यांदाच थेट सत्तेत सहभागी झाले आहे.यावेळी महाराष्ट्राचे महाचाणक्य म्हणून ज्यांचा हल्ली उल्लेख केला जाऊ लागला आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खारगे, अभिषेक मनु सिंघवी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते. एम. के. स्टॅलिन, टी. आर. बालू, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

 देशावर भाजपचे अभूतपूर्व संकट

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष अत्यंत असमान्य अशा परिस्थितीत एकत्र आले आहेत. देश आज भाजपच्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. राजकीय वातावरण अत्यंत विषारी बनले आहे.अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात बनलेली महाराष्ट्र विकास आघाडी आश्‍वासक आहे, असे सोनिया गांधी यांनी या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा