खुश खबर!, सर्व मुंबईकरांना लवकरच मिळणार लोकलने प्रवासाची परवानगी

0
98

मुंबईः अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही लोकल प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी आता सरकार पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २-३ दिवसांत मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाला बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करताना राज्य सरकारने सरसकट सर्वंसामान्यांच्या लोकल प्रवासाला परवानगी नाकारल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे मुंबईच्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यातूनही दोन-तीन तासांच्या प्रवासानंतरही मेटाकुटीला आलेला नोकरदारवर्ग आपली कार्यालये गाठत आहेत. गेल्या सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य सरकारने घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य महिलांच्या रेल्वे प्रवासाला हिरवा कंदिल दाखवला होता. त्याला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारपासून सर्व महिलांचा लोकल प्रवास सुरु झाला आहे.

सर्व सामान्य महिलांबरोबरच आता खासगी क्षेत्रातील नोकरदार पुरूष वर्गालाही लोकल प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांच्या उपस्थितीत विविध व्यावसायिक संघटना व प्रवासी संघटना आणि मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते.

सध्या फक्त अत्यावश्यक सेवा वगळता महिलांसाठी सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७ नंतर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलू  कामगार तसेच अन्य लोकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन हाच पर्याय आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत सध्या विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आजच्या बैठकीमध्ये सर्वांसाठी लोकल प्रवासाबाबत चर्चा झाली. मुंबई लोकल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे आवश्यक आहे. परंतु जितकी अर्थव्यवस्था महत्वाची तितकेच लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

लगेच होईल निर्णयः सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. हा निर्णय लगेच होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना फार काही वाट पाहण्याची आता आवश्यकता नाही. येत्या २-३ दिवसांमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल, अशी दिलासादायक माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा