केंद्र- राज्य संघर्ष पेटणारः सीबीआयला महाराष्ट्रात पूर्वसंमतीशिवाय तपासावर बंदी!

0
77
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयला देण्यात आलेली पूर्वसंमती महाविकास आघाडी सरकारने काढून घेतली आहे. पश्चिम बंगाल आणि राजस्थाननंतर असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले असून अलीकडच्या काळातील काही प्रकरणांत केंद्र सरकारकडून होत असलेला परस्पर हस्तक्षेप पाहता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.  अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.

राज्याच्या गृह विभागाने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यामुळे आता सीबीआयला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा झाल्यास आधी महाराष्ट्र सरकारची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली तरच सीबीआय महाराष्ट्रात तपास करू शकणार आहे.

 अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसह अन्य दोन वाहिन्यांनी टीआरपीमध्ये फेरफार केल्याचा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. एका जाहिरात कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे लखनऊच्या हजरतगंज पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्याआधारे सीबीआयने मंगळवारी एफआयर दाखल केला होता. टीआरपी घोटाळ्यात सर्वात आधी मुंबईत गुन्हा दाखल झाला आणि मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना केंद्र सरकारकडून हे प्रकरणही सीबीआयकडे सोपवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने सीबीआयला महाराष्ट्रात तपासावर बंदी घालण्याचे पाऊल तातडीने उचलले आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या प्रकरणांचा तपास सीबीआय आधीपासून करत आहे, त्या प्रकरणांच्या तपासासाठी ही अधिसूचना लागू नसेल. भविष्यातील प्रकरणांसाठी ही अधिसूचना लागू असेल. यापुढील कोणत्याही प्रकरणांचा तपास करायचा झाल्यास सीबीआयला आधी महाराष्ट्र सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात सीबीआयला तपास करता येणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा