राज्यपालांकडून पुन्हा खोडीः राज ठाकरेंना दिला मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला

0
1081
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यपालपदासारख्या घटनात्मकपदावर असलेल्या व्यक्तींनी राजकारणापासून लांबच रहावे, असा संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजकारणाची हौस काही केल्या जात नाही. वीज बिलासंदर्भात त्यांच्या भेटीसाठी गेलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला देऊन त्यांनी पुन्हा एकदा राजकीय खोडी काढली आहे. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे नव्हे तर शरद पवारच चालवतात, असा प्रत्यक्ष संदेशच त्यांनी देऊन टाकला आहे. यातून कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना कमी लेखण्याचा डाव साधून घेतला आहे.

 लॉकडाऊनमुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मुद्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालपदाची मर्यादा सोडून पत्र लिहिले होते. तुम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहात. अचानक धर्मनिरपेक्ष कसे झालात? असा सवाल त्यांनी या पत्रात केला होता. त्यावरून बराच वादही झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत त्यांच्या पत्राला उत्तर दिले होते.

नंतर राज्यपाल कोश्यारी यांनी पाठवलेल्या ‘जनराज्यपाल’ या कॉफी टेबल बुकवर अभिप्राय देताना शरद पवारांनी राज्यपालांच्या कारकिर्दीचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन करताना राज्यपालांचे खास पुणेरी शैलीत वाभाडे काढले होते. ‘…निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद देखील या माहिती पुस्तकात दिसून आली …असो आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल मी आपला पुनश्च आभारी आहे’, असा टोलाही पवार यांनी लगावला होता.

हेही वाचाः राज्यपालांच्या ‘ऐतिहासिक’ कारकिर्दीचे शरद पवारांनी काढले खास पुणेरी भाषेत वाभाडे!

आज त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी थेट पवारांची खोडी काढली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची बीजबिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांची भेट घेण्याचा सल्ला दिला. खुद्द राज ठाकरे यांनीच ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही पदावर नाहीत. या आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे वीजबिलासंदर्भात त्यांची भेट घेण्याचा सल्ला राज्यपालांनी देण्याचे खरे तर काहीच कारण नाही. सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा सल्ला ते देऊ शकले असते आणि असा सल्ला सनदशीरही ठरला असता. परंतु राजकारणाची खोड असलेल्या राज्यपालांनी पवारांची भेट घेण्याचा सल्ला देऊन उद्धव ठाकरे नव्हे तर शरद पवारच सरकार चालवतात, असा थेट संदेश मुख्यमंत्र्यांचे भाऊ राज ठाकरे यांच्या समक्षच कोश्यारींनी देऊन पवारांचीच खोडी काढली आहे. राज ठाकरेंना सल्ला देण्याचा कोश्यारींचा हेतू अर्थातच राजकीय असल्यामुळे शरद पवार यावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा