राज्यपाल कोश्यारींना विमानातून उतरवले; आधी विमानात बसले,परवानगी नसल्यामुळे उतरवले!

0
1537
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यपाल कोश्यारींना सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी शेवटच्या क्षणापर्यंत देण्यात न आल्यामुळे विमानात बसलेल्या राज्यपाल कोश्यारींना विमानातून उतरावे लागले आहे. त्यामुळे आता राजकारणही तापले आहे.

राज्यपाल कोश्यारी हे उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी सरकारी विमानाने डेहराडूनला जाणार होते. त्यानुसार ते विमानतळावरही पोहोचले. परंतु त्यांना सरकारी विमान वापरण्याची परवानगी शेवटच्या क्षणापर्यंत  देण्यात न आल्यामुळे त्यांना विमानातून उतरावे लागले. शेवटी कोश्यारी आणि त्यांच्यासोबतचे अधिकारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या प्रस्तावाची फाईल महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने नोव्हेंबरमध्येच राज्यपाल कोश्यारींकडे पाठवली आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी राज्यपाल कोश्यारी यांनी त्या फाईलवर कोणताही निर्णय घेतला नाही.

प्राप्त माहितीनुसार, राज्यपालांना सरकारी विमान वापरायचे असेल तर सामान्य प्रशासन विभागाला (जीएडी) एक पत्र द्यावे लागते. त्यानंतर मुख्य सचिवांमार्फत ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे पोहोचते. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरच राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याची परवानगी मिळते. परंतु राज्यपाल कोश्यारी विमानात जाऊन बसेपर्यंत अशी परवानगीच देण्यात आली नसल्यामुळे त्यांना विमानातून उतरावे लागल्याचे सांगण्यात येते. फाइल केवळ राज्यपालांनाच दाबून ठेवता येते असे नव्हे तर सरकारलाही दाबून ठेवता येऊ शकते, असेच यातून दाखवून देण्यात आल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

 आता यावरून राज्याचे राजकारणही तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ही टीका करताना राज्यपाल ही व्यक्ती नसून पद असल्याची आठवणही फडणवीसांना झाली आहे. इतका इगो असलेले सरकार यापूर्वी पाहिले नाही. सरकारला इतका प्रचंड इगो कशाचा आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. राज्यपाल ही व्यक्ती नसून पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. त्यांचा असा अपमान करणे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा