परवानगीची खातरजमा न करताच राज्यपाल कोश्यारी विमानात जाऊन बसले, म्हणून नामुष्की!

0
112
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज सरकारी विमानाने उत्तराखंडला जाण्यासाठी निघाले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते विमानतळावर पोहोचले. राज्यपाल कोश्यारी आणि राजभवनाचे अधिकारी सुमारे १५ मिनिटे विमानात बसून राहिले. विमान उड्डाणाच्या वेळी त्यांना सरकारी विमान वापरण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विमानातून उतरून त्यांना खासगी विमानाने जावे लागले होते.

राजभवनाने राज्यपालांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाकडून निरोप देण्यात येऊनही राज्यपाल कोश्यारी राजभवनाच्या अधिकाऱ्यांसह विमानतळावर पोहोचले आणि विमानात जाऊनही बसले. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. मात्र राज्य सरकारने खुलासा केल्यामुळे आता भाजप नेते बॅकफूटवर गेले आहेत.

हेही वाचाः राज्यपाल कोश्यारींना विमानातून उतरवले; आधी विमानात बसले,परवानगी नसल्यामुळे उतरवले!

राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे  अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही, असेही राज्य सरकाने म्हटले आहे.

…तरीही कारवाईचे आदेशः वस्तुत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असेही राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा