राज्यपालांवर नामुष्कीः वादंग उठताच आढावा बैठका रद्द करून कोश्यारी मराठवाडा दौऱ्यावर!

0
967
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठका ठेवल्यामुळे वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर कोश्यारी यांच्यावर एक पाऊल मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. आजपासून मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांचा सुधारित दौरा राजभवनाने जारी केला असून नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आता कोश्यारी फक्त शासकीय विश्रामगृहांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

राज्यपाल कोश्यारी हे आज नांदेड येथे येणार आहेत. नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुले आणि मुलांच्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर राज्यपाल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार होते. शुक्रवारी ६ ऑगस्टला हिंगोली आणि शनिवारी ७ ऑगस्टला परभणीतही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ठेवली होती. राज्यपाल कोश्यारी यांच्या या तिन्ही आढावा बैठकावरून मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र आक्षेप घेण्यात आला होता.

राज्यपाल कोश्यारी हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा आणि राज्यात दोन सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संतप्त भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या होत्या. मंत्रिमंडळ सदस्यांच्या या संतप्त भावना पाहता राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नयेत, तो सरकारचा अधिकार आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत. राज्यपाल आहात. राज्यात दोन सत्ता केंद्रे निर्माण करू नका, असे राज्यपालांना अवगत करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. कुंटे यांनी लगेच राजभवनाच्या सचिवांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप कळवला होता. त्यानंतर या तिन्ही आढावा बैठका रद्द करून राज्यपालांचा सुधारित दौरा राजभवनाने जारी केला आहे.

राजभवनाने जारी केलेल्या सुधारित दौऱ्यानुसार नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आज दुपारी ३ वाजताची, उद्या दुपारी ४ वाजताची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि परवा सायंकाळी ६ वाजता परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवलेली आढावा बैठक रद्द करण्यात आली आहे. या दौऱ्यात राज्यपाल कोश्यारी हे शासकीय विश्रामगृहांवर जिल्हा प्रशासनाशी फक्त चर्चा करणार आहेत.

राज्यपालांवर दुसऱ्यांदा नामुष्कीः राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे कोश्यारी यांच्या खासगी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने सरकारी विमान नाकारले होते. त्यामुळे सरकारी विमानात बसून खाली उतरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. त्यानंतर आता तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यात जिल्हा प्रशासनासोबतच्या आढावा बैठका रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालपदासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर पहिल्यांदाच अशा प्रकारची दोनवेळा नामुष्की ओढवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा