प्रत्येक आमदाराच्या निधीतून खर्च होणार कोरोना उपाययोजनांसाठी १ कोटी रुपये!

0
179

पुणेः राज्यातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून कोरोना प्रतिबंधक उपायजोनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदाराच्या निधीतून एक कोटी रुपये खर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

पुण्यातील विधानभवनात आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत तर आहेच शिवाय उपलब्ध आरोग्य सुविधाही कमी पडू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा एक कोटींचा निधी प्रत्येक आमदार त्यांच्या मतदारसंघात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करू शकेल.

…तर पूर्वीसारखा कडक लॉकडाऊनः पहिल्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. याहीवेळी नागरिकांनी निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा पूर्वासारखा कडक लॉकडाऊन जाही करावा लागेल. तशी वेळ येऊ देऊ नका, अशी आमची नागरिकांना विनंती आहे, असे अजित पवार म्हणाले.

आरोग्य यंत्रणेला नाउमेद करू नकाः राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, असे चित्र अजिबात झालेले नाही. उगाच आरोग्य यंत्रणेला नाउमेद करू नका. ती यंत्रणा वर्ष झाले जिवाचे रान करत आहे. प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर देण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ सांगतात. पण डॉक्टर रेमडिवीर आणायला सांगतात. मग रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक आमदार-खासदारांना फोन करायला लागतात, असेही पवार म्हणाले.

कोरोना लढ्यासाठी मिळणार ३४२ कोटी रुपयेः प्रत्येक आमदाराच्या निधीतून त्या त्या मतदारसंघात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी १ कोटी खर्च करण्याच्या या निर्णयामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ३४२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. विधान सभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ असे महाराष्ट्रात एकूण ३५४ आमदार आहेत. त्यापैकी विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा