देवेंद्र फडणवीसांना झटकाः जलयुक्त शिवार योजनेची होणार एसआयटीमार्फत खुली चौकशी

0
245
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीसांच्या भाजप सरकारने मोठा गाजावाजा करून राज्यात राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) खुली चौकशी करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे फडणवीस आणि भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. फडणवीस सरकारने १० हजार कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजना राबवली होती. मात्र या योजनेचा काहीही उपयोग झाला नाही, असे ताशेरे कॅगने ओढले होते. कॅगने दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर या योजनेची चौकशी केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी राज्याच्या गृह मंत्रालयामार्फत एसआयटीची स्थापना केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजना राबवून राज्यातील टँकर्सची संख्या वाढली आहे. आधी राज्यात दीडहजार टँकर्स लागत होते. आताही संख्या पाच हजार टँकर्सवर गेली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात पाणीपातळी वाढली की नाही, याची झाडाझडती ही एसआयटी घेणार आहे.

अहमदनगर, बीड, बुलडाणा, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे योग्य पद्धतीने करण्यात आली नाहीत. या चार जिल्ह्यात या योजनेवर २ हजार ६१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कॅगने जलयुक्त शिवार योजनेची  १२० गावांत पाहणी केली होती. या गावांमध्ये दुरूस्ती आणि देखभालीसाठी निधीच दिला नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा