आरोग्य विभागात नर्सेससह ८ हजार ५०० पदांची लवकरच भरतीः आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

0
705
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः नर्सेसच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्तपदांपैकी ५० टक्के म्हणजेच ८ हजार ५०० पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्या वतीने वेबिनार आयोजित करण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यावेळी टोपे यांनी ही माहिती दिली. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास,संचालक डॉ.अर्चना पाटील, डॉ.अभय शुक्ला, डॉ श्वेता मराठे, नर्सिंग संघटनेच्या प्रा.प्रविणा महाडकर,डॉ. स्मिता राणे उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू.शासकीय रुग्णालयाची सेवा, स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे. तोही लवकरच मंजूर होईल, असेही टोपे म्हणाले.

सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहिका दाखल होतील. असेही टोपे यांनी सांगितले.

तत्पूर्वी नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा