अनिल देशमुख यांचा अखेर गृहमंत्रिपदाचा राजीनामा

0
152
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश आजच मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख हे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले महाविकास आघाडी सरकारमधील दुसरे मंत्री आहेत.

गृहमंत्री देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. या आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर  त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.

मुंबई उच्च न्यायालयाने ऍड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून आज सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने मी गृहमंत्रिपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वतःहोऊन पदापासून दूर  राहण्याचा निर्णय घेत आहे. मला गृहमंत्रिपदावरून कार्यमुक्त करण्यात यावे, असे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा