ड्रॅगन फ्रूटची लागवड करायचीय?, अनुदानासाठी ‘येथे’ करा अर्ज

1
875
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. यासंबधी अधिक माहितीसाठी संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे यांनी केले आहे.

 ड्रॅगन फ्रूट (कमलम) एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि अन्टीऑक्सिडन्टमुळे या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात.

 या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य आहे. पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्य इ. बाबी लक्षात घेऊन सन २०२१-२२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.

ड्रॅगन फ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये ३ मीटर X ३ मीटर, 3 मीटर X 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदून खड्डयाच्या मधोमध सिमेंट काँक्रिटचा किमान ६ फूट उंचाचा खांब व त्यावर काँक्रिटची फ्रेम बसवण्यात यावी. सदर सिमेंट काँक्रिट खांबाच्या एक बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

ड्रॅगन फ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण याबाबींकरीता अनुदान देय आहे. या करिता रक्कम ४ लाख लाख प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे रक्कम १ लाख ६० हजार रुपये अनुदान तीन वर्षात ६०:२०: २० या प्रमाणात देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील, असेही त्यांनी कळविले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा