मंत्री सुभाष देसाई स्वतः तपासणार समृद्धी महामार्गाच्या कामाची गुणवत्ता!

0
33

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या ११२ किलो मीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाची गुणवत्ता आणि कामाच्या प्रगतीची डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  बैठकीत देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग योजनांच्या आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग-स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला. समृद्धी महामार्गामुळे कमी वेळात मोठे अंतर गाठणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यादृष्टीने या महामार्गाचे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित कालमर्यादेतच पूर्ण करावे. त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा, नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.

 या कामाच्या प्रगती आणि गुणवत्तेची पालकमंत्री सुभाष देसाई येत्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ११२ किलोमिटर असून रुंदी १२० मीटर आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा असणार आहे. या ठिकाणांहून नागरिकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर येता येईल.

हा महामार्ग सहा लेनमध्ये असून यावर वाहनांना  ताशी १५० कि.मी. वेग मर्यादा असणार आहे. महामार्गावर ५०कि.मी.च्या अंतरावर नागरी सुविधा केंद्रही असणार आहे. १ मे २०२१ रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे साळुंखे यांनी सांगितले.

औरंगाबाद- वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड-अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देशही देसाई यांनी दिले. रस्ते दुरुस्तीच्या कामांतदर्जा आणि कालबध्दता पाळण्यास प्राधान्य द्यावे, वैजापूर -औरंगाबाद रस्ते दुरुस्ती ही प्रथम प्राधान्याने तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडीया या यंत्रणांनी तातडीने सर्व तांत्रिक  बाबींची पूर्तता करुन दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा