भाजप सांगते ‘शिवरायांचे विचार, हाच आमचा आचार’, पण चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवरायांचा इतिहासच केला गायब

0
148
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः शिवरायांचे विचार हाच आमचा आचार असे घोषवाक्य देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप मते मागत असतानाच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून छत्रपती शिवरायांचा इतिहासच गायब करून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित 81 शाळा आहेत. यापैकी 13 शाळांमध्ये चौथीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून या चौथीच्या पुस्तकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवजी महाराज यांचा इतिहासच वगळण्यात आला आहे. आजवर चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवण्यात येत होता.  मात्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकात गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही उल्लेख केलेला नाही. केवळ भारतीय लोक या घटकात शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लालबहादूर शास्त्री आणि हनुमान यांचा त्रोटक माहिती देण्यात आली आहे.

शिवरायांचा इतिहास पुसणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा : छत्रपती शिवरायांचा इतिहास वगळण्याच्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या या निर्णयावर शिक्षण क्षेत्राबरोबरच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसन टिकास्त्र सोडले असतानाच सत्ताधारी भाजपने मात्र याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. आंततराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपवण्याचा घाट घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी करून हे सत्तेत आले आहेत. तरीही ते शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम करत आहेत. ही भयानक चीड आणणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील जनतेने एकत्र येऊन शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या सरकारला हद्दपार करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हिडीओ पोस्ट करून म्हटले आहे.

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही : भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा अवमान सरकारने केला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून चौथीच्या पुस्तकात असलेला छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अपमानास्पद आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. छत्रपतींचा धडा वगळू नये, हा विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही सरकराने उल्लंघन केले आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याचा भाजपचा हा कट आहे. शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला 21 ऑक्टोबरला धडा शिकवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असे मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा