राज्यात कोरोनाची दुसरी लाटः जिल्हा प्रशासनाची आत्मसंतुष्टी व लोकांच्या बेफिकीरीवर केंद्राचे बोट

0
126
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असतानाच महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी आणि लॉकडाऊनच परिणाम मर्यादित आहेत. त्यामुळे कठोर कंटेनमेंट धोरणावर लक्ष केंद्रित करावे आणि कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांत लसीकरणाची गती वाढवावी, असेही या पत्रात म्हटले आहे. आधीच भरपूर करून झाले, यातच जिल्हा प्रशासन आत्मसंतुष्ट आहे आणि ग्रामीण-शहरी भागातील लोक कोरोना नियमावलीचे पालनच करत नाहीत, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले होते. या पथकाने आपला अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर केल्यानंतर त्या अहवालाच्या आधारे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले आहे. राज्याचा पॉझिटिव्ही दर कमी करावा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असा सल्ला या पत्रात देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेत कोरोना संसर्गाशी सुसंगत वर्तनाचा अभाव आणि ट्रेसिंग व टेस्टिंगची कमरता असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रारंभाच्या टप्प्यावर आहे. ट्रॅकिंग, टेस्टिंग, आयसोलेशन आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्याचे सक्रिय प्रयत्न मर्यादित स्वरुपात आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील लोक कोरोना नियमावलीचे पालनच करत नाहीत, असेही या पत्रात म्हटले आहे. न्यूजटाऊननेही लोकांच्या बेफिकीरकडे वारंवार लक्ष वेधले आहे.

देशातील कोरोनाचे सर्वाधिक सक्रीय रूग्ण असलेले टॉप टेन जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे हाच एकमेव मार्ग असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

ऍक्टिव्ह रुग्णांत १७१.५ टक्के वाढः महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरातच महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत १७१.५ टक्के वाढ झाली आहे. १० फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजार ९१७ होती, ती ११ मार्च २०२१ रोजी १ लाख २४० वर पोहोचली, असे भूषण यांनी या पत्रात म्हटले आहे.

औरंगाबाद, नाशिकमध्ये मृत्यूदर सर्वाधिकः औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलजे यासारख्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूदर सर्वाधिक आहे. त्याचे विश्लेषण करण्याची गरज असून या मृत व्यक्तींचे जनुकीय संरचनेचे नमुने पाठवण्याची गरज आहे, असे भूषण या पत्रात म्हणतात.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मर्यादितः कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मर्यादित असल्यामुळे लक्षणे नसलेले आणि पूर्वलक्षणे असलेल्या लोकांचे ट्रॅकिंग आणि टेस्टिंगच केले जात नाही. त्यामुळे आयसीएमआरने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या वाढण्याचा सल्लाही या पत्रात दिला आहे.

औरंगाबादेत पॉझिटिव्ही दर ३० टक्केः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर उच्च आहे. मुंबईमध्ये तो ५.१ टक्के आहे तर औरंगाबादेत तो ३० टक्के आहे. अनेक केसेसची चाचणीच केली जात नाही आणि समाजात मोठ्या प्रमाणात संसर्गाचा फैलाव आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासन आत्मसंतुष्टः एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे जिल्हा प्रशासन या वाढत्या स्थितीबद्दल फारसे चिंतित नाही. आधी भरपूर करून झाले आहे, अशा अविर्भावात जिल्हा प्रशासन आहे. ही आत्मसंतुष्टी धोकादायक ठरू शकते, असेही या पत्रात म्हटले आहे.

न्यूजटाऊनवरील मजकुराचे हक्क संरक्षित आहेत. विनापरवानगी अंशतः किंवा पूर्णतः प्रकाशित करण्यावर प्रतिबंध आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा