महसुली जमा आता एका क्लिकवर, ‘ग्रास महाकोष महाराष्ट्र’ मोबाइल ॲप उपलब्ध

0
62

मुंबई: संचालनालय, लेखा व कोषागारे संचालनालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत विकसित केलेल्या महसुली कर व करेतर रकमा भरण्याची सुविधा देणारे  ‘ग्रास महाकोष महाराष्ट्र’या मोबाइल ॲपचे उद्घाटन आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिकही चोवीस तास या ग्रास ॲपचा वापर करुन शासन खाती रक्कम जमा करू शकतात.हे ॲप ग्रास वेबसाईट व गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. एनआयसीचे अधिकारी बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा ॲप विकसित करण्यात वाटा आहे.

देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाइन पध्दतीने करण्यात येत असलेल्या संचालनालय, लेखा व कोषागारे या विभागात ग्रास मोबाईल अँपचे विकसन हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्यामुळे वित्त विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

नवीन निवृत्ती वेतनधारकांना त्वरित पीआरएएन क्रमांक व पीआरएएन कार्ड ऑनलाइन मिळण्याकरता ऑनलाइन प्राण जनरेशन मॉड्युल (ओपीजीएम) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वेतन पडताळणी मार्गदर्शिका पु‍स्तक यावेळी प्रकाशित करण्यात आले.

या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील? याबाबत मार्गदर्शक ठरेल असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. ही पुस्तके पीडीएफ स्वरुपात संचालनालयाच्या महाकोष या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहेत. सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी ग्रास महाकोष महाराष्ट्र या मोबाइल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालक ज.र.मेनन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा