लॉकडाऊनची नियमावली मुख्यमंत्र्यांच्या मृदू भाषेच्या तुलनेत कैकपट कठोर, कशी? ते वाचा…

0
291
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई  राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग खंडित करण्यासाठी उद्या बुधवारी (१४ एप्रिल) रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंत राज्यात कलम १४४ लागू करून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर राज्यातील जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. त्याचवेळी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रेमळ शब्दांत संचारबंदी सांगितली, त्यापेक्षाही ही नियमावली कठोर असल्याचेच दिसून येत आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंतच्या कालावधीसाठी जारी केली असून कोणत्याही व्यक्तीला अनावश्यक घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही नियमावली पुढील प्रमाणेः

अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू, पण निर्बंधांचे कठोर पालनः किराणा, फळे, भाजीपाला इत्यादी अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने सुरू राहतील. मात्र दुकान मालक, त्यांचे कर्मचारी आणि दुकानात येणारे ग्राहक यांना कोरोनानुरूप वर्तनाचे काटेकोर पालन करावे लागेल. दुकान मालक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक. दुकानदारांनी सुरक्षा उपाययोजना म्हणून ग्राहकांशी पारदर्शक काच किंवा अन्य मटेरियलच्या शिल्डच्या वापराबरोबरच इलेक्टॉनिक पेमेंट पद्धती वापरावी.

हेही वाचाः राज्यात उद्या रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन, ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज जाहीर

  • अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, त्यांचे कर्मचाऱ्यांनी नियमावलीचे पालन केले नाही तर ५०० रुपये दंड आणि कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या ग्राहकाला सेवा दिल्यास १ हजार रुपये दंड आकरला जाईल. वारंवार उल्लंघन केल्यास असे दुकान ही नियमावली लागू असेपर्यंत बंद केले जाईल.

गर्दीच्या ठिकाणी फळे-भाजीपाला, बेकरी उत्पादन विक्रीवर निर्बंधः किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी अशा सर्व प्रकारची दुकाने गर्दीच्या ठिकाणी आहेत का किंवा या ठिकाणी गर्दी होते काय, याचा स्थानिक प्रशासनाने अभ्यास करावा.  जेथे गर्दी होईल, अशी ठिकाणे बंद करावी. अत्यावश्यक सेवेची ठिकाणे कोरोना प्रसाराची केंद्रे बनणार नाहीत, यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. अशी भाजीपाला, फळविक्रेत्यांची दुकाने खुल्या सार्वजनिक जागेत स्थलांतरित करावीत.

 बंद दुकानदारांनाही करावी लागणार तयारीः सध्या जी दुकाने बंद राहणार आहेत, त्या दुकानदारांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी पारदर्शक काच किंवा अन्य शिल्ड आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटची तयारी करावी. म्हणजे सरकारला कोरोनाची भीती न बाळगता ही दुकाने  उघडण्याची कारवाई करता येईल.

सार्वजनिक वाहतूकः पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार असली तरी या वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. रीक्षामध्ये चालक आणि दोनच प्रवाशांना परवानगी असेल. टॅक्सीत क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसवता येतील. बसमध्ये आरटीओच्या नियमाप्रमाणे  पूर्ण सीट्सवर प्रवासी घेता येतील. उभ्याने प्रवास करता येणार नाही.

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या व्यक्तीने योग्य पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसे  आढळले नाही तर ५०० रुपये दंड आकारला जाईल. चारचाकी टॅक्सीत एक जरी व्यक्ती विनामास्क असेल तर त्या व्यक्तीबरोबरच टॅक्सीचालकालाही ५०० रुपये दंड आकारला जाईल.

यांना असेल लॉकडाऊन काळात मुभाः

कार्यालयेः केंद्र, राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाची कार्यालये सुरू राहतील. सहकार, सार्वजनिक उपक्रम आणि खासगी बँका, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्यांची कार्यालये, विमा/ मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन आणि वितरण करणाऱ्या फार्मास्युटिकल्स, सर्व बिगर वित्तीय महामंडळे, मायक्रो फायनान्स संस्थांची कार्यालये, न्यायालये, न्यायाधिकरणांचे कामकाज सुरू असेल तर वकिलांची कार्यालये सुरू राहतील.

  • परंतु कोरोना उपाययोजनांशी संबंधित सरकारी कार्यालये वगळता उर्वरित सर्व कार्यालयात कमीत कमी कर्मचाऱ्यांत आणि क्षमतेपेक्षा ५० टक्के कर्मचाऱ्यांत कामकाज चालवावे. स्थानिक प्रशासन मुभा द्यावयाच्या कार्यालयांची या यादीत भर घालू शकते.
  • कोणत्याही कार्यालयात अभ्यागंतांना परवानगी नसेल. कार्यालयाबाहेरील व्यक्ती जर बैठकीला हजर राहणे आवश्यक असेल तर त्याला त्या बैठकीत ऑनलाइन सहभागी करून घ्यावे.

खासगी वाहतूकः खासगी बसेससह खासगी वाहने फक्त आणीबाणी, अत्यावश्यक सेवा किंवा आवश्यक कारणांसाठीच चालवल्या जाऊ शकतील. अन्यथा १ हजार रुपये दंड आकारला जाईल.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारः सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारमधील आतील सेवा बंद राहील. ही सेवा हॉटेल्सचा अविभाज्य भाग असलेल्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र सुरू राहील. रेस्टॉरंट्स आणि बारला फक्त होम डिलिव्हरी सेवा देता येईल. पार्सल घेण्यासाठी ग्राहकांना तेथे जाता येणार नाही. हॉटेल्समधील रेस्टॉरंट्स आणि बार इन हाऊस गेस्टसाठी सुरू राहतील.

प्रवेशद्वारावरच होम डिलिव्हरीः होम डिलिव्हरीची सुविधा एकापेक्षा जास्त कुटुंबे असणाऱ्या इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत देता येईल. होम डिलिव्हरीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस १ हजार रुपये आणि आस्थापनास १० रुपये दंड आकारला जाईल. वारंवार उल्लंघन केल्याचे आढळल्यास  कोरोना महामारी संपेपर्यंत लायसेन्स रद्द केले जाईल.

 रस्त्यालगतचे खाद्य पदार्थ विक्रेतेः ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सुविधा किंवा होम डिलिव्हरीसाठीच सुरू राहतील. या दुकानांच्या ठिकाणी खाद्यपदार्थ खाता येणार नाहीत. पार्सलसाठी वेटिंग करणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य राहील. नियमाचे उल्लंघन करणारे ग्राहक आणि विक्रेत्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल.

धार्मिक स्थळेः सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील. पुजाऱ्यांना पूजाअर्चा करता येईल, मात्र बाहेरच्या व्यक्तीस प्रवेश असणार नाही. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सलून, स्पा, ब्युटी पार्लर्सः सर्व सलून, स्पा, ब्युटी पार्लर्स बंद राहतील. अत्यावशक सेवेत न येणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील. गार्डन, समुद्र किनारे बंद राहतील.

 धार्मिक, राजकीय कार्यक्रमः सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील. ज्या ठिकाणी निवडणुका असतील तेथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असेल. अशा ठिकाणी जास्तीत जास्त २०० लोक किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या ठिकाणच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थितीची परवानगी असेल. या कार्यक्रमांच्या ठिकाणी देखरेखीसाठी सरकारी अधिकारी तैनात असेल.

 लग्न समारंभासाठी २५ व्यक्तींना परवानगीः लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थितीची परवानगी असेल. मंगल कार्यालयातील कर्माचाऱ्यांचे लसीकरण अनिवार्य असेल. त्या कर्माचाऱ्यांकडे आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक असेल, कर्मचाऱ्याने लस घेतली नसेल किंवा निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्याला १ हजार रुपये  आणि मंगल कार्यालय चालकाला १० रुपये दंड ठोठावला जाईल.

 अंत्यविधीसाठी २० लोकचः अंत्यविधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीलाच परवानगी असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा