पोलिस मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिने शिक्षा, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

0
431
संग्रहित छायाचित्र.

अमरावतीः आठ वर्षांपूर्वी एका पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती न्यायालयाने महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ठाकूर यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर भाजपने लगेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा जलयुक्त शिवार योजनेत भाजप नेत्यांनी काय दिवे लावले, यावर भाजप नेत्यांनी बोलावे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

यशोमती ठाकूर, त्यांचा वाहनचालक आणि अन्य दोन कार्यकर्त्यांनी आठ वर्षांपूर्वी अमरावतीतील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसाला मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यांचा वाहनचालक आणि अन्य दोन कार्यकर्त्यांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात फितूर होऊन साक्ष देणाऱ्या एका पोलिसालाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर यशोमती ठाकूर यांनी पलटवार केला असून भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा पाच वर्षांत त्यांच्या नेत्यांनी काय कारनामे केले त्याविषयी बोलावे.जलयुक्त शिवार, योजनेत काय दिवे लावले?, किती भ्रष्टाचार झाला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

 मी एक वकील असून न्यायालयाने जो निर्णय दिला, त्याविषयी काहीही बोलणार नाही. या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असून तेथे नक्कीच न्याय मिळेल, याचा विश्वास आहे. एका महिलेच्या मागे अख्खा भाजप लागला आहे. माझी भाजपच्या विचारसरणीविरोधात लढाई आहे. आम्हाला कितीही संपवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही लढतच राहू, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा