विधान परिषद निकाल: जनतेच्या प्रश्नावर निवडणूक नव्हती म्हणून हारलोः काँग्रेसचा अजब दावा

0
186
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः नागपूर आणि अकोला विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक ही जनतेच्या प्रश्नावर नव्हती. ही निवडणूक जनतेच्या प्रश्नावर झाली नाही म्हणून आम्ही हारलो, असा अजब दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका जनतेच्या प्रश्नावर नव्हत्या. जनतेच्या प्रश्नावर निवडणूक होते, तेव्हा भाजपचा पराभव होतो, असेही लोंढे म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. त्यांचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, नागपूर विधान परिषद निवडणुकीत नाना पटोले यांचा कारभार एककल्ली होता, असे प्रवीण दरेकर एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे ते दबावाला बळी पडल्याचेही म्हणतात. प्रवीण दरेकर डोक्यावर पडल्यासारखी परस्परविरोधी विधाने करत आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची ताकद असतानाही नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता. तब्बल ५८ वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे होता. आताच्या निवडणुकीनंतर भाजप नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मग हाच न्याय नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी लावला असता तर फडवणीस आणि गडकरी यांनी राजकारण सोडून पळ काढला पाहिजे होता, असेही लोंढे म्हणाले.

हेही वाचाः विधान परिषद निवडणूकः नागपूर, अकोल्यात भाजपचा विजय; काँग्रेसची मते फुटली

राजीनाम्याची मागणी होत असेल तर चूक नाही-दरेकरः भाजप पक्ष एकसंध असल्याचे विधान परिषद निवडणुकीच्या ताज्या निकालांनी दाखवून दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या होमपीचवर काँग्रेसला विजयी करू शकले नाहीत. त्यांचा कारभार एककल्ली होता. त्यांनी पक्षावर दबाव आणून दोन उमेदवार बदलायला लावले. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटले. या सगळ्याची जबाबदारी घेऊन नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत असेल तर त्यामध्ये काहीही चूक नाही. ज्यांना अकोला आणि नागपूर विधान परिषदेच्या जागेवर विजय मिळवता आला नाही, ते भविष्यात राज्याचे नेतृत्व काय करणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर दिली.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

महापालिका निवडणुकीतील विजयाची नांदी- दानवेः विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची साथ सोडून शिवसेनेने नको त्यांच्याशी संगत केली. त्यामुळे जनता शिवसेनेवर नाराज आहे. महापालिकेतील लोकांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात मतदान केल्यामुळे हा विजय झाला आहे. राज्यातील जनतेने दिलेला हा कौल राज्य सरकारविरोधात आहे. आगामी महापालिका निवडणुकांमधील विजयाची ही नांदी आहे. आगामी निवडणुकांत भाजपचाच विजय होईल. कारण महाराष्ट्रातील जनतेची नाराजी महाविकास आघाडी सरकारला भोवेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा