महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर, दोन दिवसांत नवीन निर्बंध लागू होण्याची शक्यता!

0
805
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाची दुसरी लाट अजून पुरती ओसरली नसतानाच महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावू लागल्याने सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना देणे सुरू केले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नव्याने काही निर्बंध लागू होण्याची स्पष्ट शक्यता बोलून दाखवली आहे.

मुंबई आणि पुण्यासह राज्याच्या काही भागांत कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा वाढता दिसत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर होत असलेली ही रूग्णवाढ पाहता लोकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. ही रूग्णवाढ पाहता काही नवे नियम तसेच निर्बंध लावले जाऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दोन दिवसांत तज्ज्ञांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेणार आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात निर्बंध कडक केले जाण्याची शक्यताही वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे.

हेही वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा विचार करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्याबाबत विचारले असता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही आणि आजच्या बैठकीत त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचाः तिसरी लाट उंबरठ्यावरः गर्दीचे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम तत्काळ स्थगित कराः मुख्यमंत्री

नागपुरात तीन दिवसांत कठोर निर्बंधः गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोनाबाधितांची संख्या परत दोन आकडी झाली आहे. ही धोक्याची घंटा असून नागपूर जिल्हा कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. पुढील दोन-तीन दिवसांत व्यापारी, उद्योजक व अनुषांगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक यांची बैठक घेऊन कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. पुढील तीन दिवसांत यासंदर्भात निर्णय घोषित करावा, अशी सूचना राऊत यांनी या बैठकीत केली.

हेही वाचाः अपने को तो रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके… ऐका करुणा शर्माची व्हायरल कॉल रेकॉर्डिंग!

गर्दीचे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम तत्काळ स्थगित करा-मुख्यमंत्रीः कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज या संदर्भातील एक आवाहन जारी केले आहे. त्यात ते म्हणतात की, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा