आरोग्य खात्याच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधील भाजयुमोच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

0
96
संग्रहित छायाचित्र.

बीडः आरोग्य खात्याच्या नोकर भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून या पेपरफुटीचे धागेदोरे बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी संजय सानप याला बेड्या ठोकल्या आहेत. संजय सानप हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पाटोदा तालुका अध्यक्ष होता.

भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी संजय सानप याला या पेपरफुटी प्रकरणी चौकशीसाठी पुण्यात नेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याचा या पेपरफुटी प्रकरणात सहभाग आढळल्यामुळे पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संजय सानपच्या संपर्कात असलेले आणखी सहा जण पुणे सायबर पोलिसांच्या रडावर असल्याची माहितीही मिळते आहे. संजय सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

संजय सानप याने कोणाच्या व कशाच्या माध्यमातून आरोग्य खात्याच्या गट ड व क या संवर्गाच्या परीक्षेचा पेपर परीक्षार्थींना दिला याबाबत सखोल तपास करायचा आहे. त्याच्या घराची झडती घेऊन त्यामध्ये सापडणाऱ्या पुराव्याच्या आधारे आरोपीकडे तपास करायचा आहे, असे सांगत सायबर पोलिसांनी संजय सानपची सात दिवसांच्या पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संजय सानप हा चौकशीसाठी पुण्यात होता. राजेंद्र सानप याच्या सोबतचा संवाद आणि इतर काही पुरावे मिळाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोग्य खात्यातील नोकर भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा ठेवण्यात आली होती. या परीक्षेतील गट ड संवर्गातील परीक्षेचा पेपर फुटला होता. या पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, आरोग्य अभियानाचे महासंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह आतापर्यंत पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींत ७ जण बीडचे आहेत. संजय सानप हा या घोटाळ्यातील आरोपी राजेंद्र सानप याच्या संपर्कात होता. त्याच्या संपर्कातील काही पुरावे हाती लागल्यामुळे संजय सानपला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जाळ्यात अडकणारा संजय सानप हा बीड जिल्ह्यातील आठवा आरोपी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा