नव्या सरकारवर दोन्ही काँग्रेसचे एकमत, शिवसेनेशी उद्या चर्चेनंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा

0
127
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/मुंबई:

 राजधानी दिल्लीत दोन दिवस चाललेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर नव्या सरकारशी संबंधित सर्व मुद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून उद्या शुक्रवारी दोन्ही काँग्रेसचे नेते आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करतील. त्यानंतर हे नेते शिवसेनेशी चर्चा करतील. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या दृष्टीने शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 6, जनपथ या दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची गुरूवारी दुसऱ्यांदा बैठक झाली. बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक माध्यमांना सामोरे गेले. आज दोन्ही काँग्रेसची दुसरी बैठक पार पडली. त्यात सर्व मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले. त्यामुळे आम्ही आता मुंबईकडे निघालो आहोत. उद्या ( शुक्रवारी) मुंबईत गेल्यावर आमच्या आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यांना संपूर्ण तपशील देऊ. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू आणि मग तिन्ही पक्ष मिळून अंतिम घोषणा करू. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेबाबतची पुढील कारवाई करू, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 पाचच काय सरकारपंधरा वर्षे टिकेल

 काँग्रेस- राष्ट्रवादीमधील चर्चा फलदायी ठरली  आहे. सकारात्मकदृष्टीने चर्चा पुढे गेली असून मित्रपक्षांशी  भेटून उचित पावले उचलली जातील. काही जणांना चर्चेच्या फेर्‍या कशासाठी असा प्रश्‍न काही जणांना पडला असेल.पण जे ठरेल ते पूर्ण विश्‍वासाने ठरले आणि सरकार भक्कम पायावर उभे राहिले तर सरकार पाचच काय पंधरा वर्षेही टिकेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार चालवण्याचा भक्कम अनुभव आहे. आता शिवसेना हा नवा मित्र आम्ही जोडत आहोत. त्यामुळे समन्वय राखला जाईल, याची काळजी घेतली जाईल, असेही पाटील म्हणाले.

 उद्या सायंकाळी उद्धव ठाकरेंशी चर्चा

 मित्रपक्ष आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली शिवसेना आमदारांची नियोजित बैठक सकाळी 10 वाजता ठेवण्यात आली आहे. या भेटीनंतरच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नव्या महाविकास आघाडीची  घोषणा करण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर तिन्ही पक्षांचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याचीही शक्यता आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या सत्तापेचावर दिल्लीत खलतबतेः उद्या एकसूत्री कार्यक्रम निश्चिती, शुक्रवारी सत्तेचा दावा?

 तिन्ही पक्षांची असणार समन्वय समिती

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारसरणी एक असली तरी भिन्न विचारसरणीच्या शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात नवे सरकार स्थापण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. राज्याला स्थिर आणि विकासामुख सरकार देण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात आघाडीत बिघाडी होऊ नये आणि सरकार सुरळीत चालावे म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एक समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या समन्वय समितीत 12 सदस्य असतील आणि मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते यांचा त्यात समावेश असेल, असे सांगण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा