महाराष्ट्राच्या सत्तापेचावर दिल्लीत खलतबतेः उद्या एकसूत्री कार्यक्रम निश्चिती, शुक्रवारी सत्तेचा दावा?

1
203
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/ मुंबईः राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सांगत असले तरी राजधानी दिल्लीत पडद्यामागून जोरदार खलबते सुरू आहेत. उद्या बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीतच बैठक होणार असून या बैठकीत किमान समान कार्यक्रमाला अंतिम स्वरुप दिले जाणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना  ओळखपत्र आणि आधार कार्ड घेऊन शुक्रवारी मुंबईत आयोजित बैठकीला बोलावले आहे. या बैठकीनंतर शिवसेना राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसात राज्यातील सत्तापेच सुटण्याची चिन्हे आहेत.

 बुधवारी सायंकाळी दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खारगे, पृथ्वीराज चव्हाण हे नेते उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याबरोबरच आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाला अंतिम स्वरुप दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या आघाडीची संपूर्ण रुपरेखा निश्‍चित झाल्यावरच त्यावर भूमिका स्पष्ट करायची, तोपर्यंत माध्यमांनाही ताकास तूर लागू द्यायचा नाही, अशी भूमिका दोन्ही काँग्रेसनी घेतल्याचे गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या विधानांवरून स्पष्ट होत आहे. माध्यमांना हा सस्पेन्स वाटत असला तरी पडद्यामागे व्यवस्थित बोलणी आणि हालचाली सुरू आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटेल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट झाल्यानंतर रात्री शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आजही राऊतांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सुमारे दहा मिनिटे खलबते केली. अशा भेटी आणि पडद्यामागून खलबतांचा सिलसिला सोमवारपासून सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर सरकार स्थापन करायला वेळ लागतो, असे संजय राऊत म्हणाले. तर आम्ही शिवसेनेचा सन्मान राखू, मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात भांडणे  असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. या दोघांच्याही वक्तव्यातून सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत मिळत आहेत.

 शुक्रवारी ओळखपत्रासह शिवसेना आमदार मुंबईत

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या शुक्रवारी, 22 नोव्हेंबरला  दुपारी 12 वाजता सर्व शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली असून या बैठकीला येताना आमदारांना ओळखत्र आणि आधार कार्ड घेऊन येणे अनिवार्य करण्यात आले आहे. येताना पाच दिवसांचे कपडेही सोबत आणा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबतची सरकार स्थापनेची बोलणी पूर्ण झालेली असेल. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीनंतर शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा