राज्यपालांनी विधान परिषदेवर पाठवलेच नाही तर ठाकरेंची खुर्ची हिरावण्यात भाजप यशस्वी होईल?

0
3847
संग्रहित छायाचित्र .

मुंबईः महाराष्ट्रात सध्या दोन युद्ध सुरू आहेत. एक युद्ध कोरोनाच्या संसर्गाविरुद्ध आणि दुसरे युद्ध राजकीय अस्थिरतेविरूद्ध सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नामनिर्देशित करा आणि राजकय अस्थिरता संपुष्टात आणा, असा ठराव राज्य मंत्रिमंडळाने सोमवारच्या बैठकीत पुन्हा एकदा घेऊन तसा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आधीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेणारे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक संघा’चे निष्ठावान स्वयंसेवक कोश्यारी आता या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या कोट्यातील दोनपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामनिर्देशित करावे, असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने ९ एप्रिल रोजी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवला होता. राज्यपाल कोट्यातून कला आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना विधान परिषदेवर पाठवण्यात येते. उद्धव ठाकरे हे कुशल छायाचित्रकार असून त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शने झाली आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत, अशी पार्श्वभूमी सांगत त्यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती ९ एप्रिल रोजी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात केली होती. परंतु राज्यपाल कोश्यारी यांनी १८ दिवस उलटले तरी या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही.

राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर राज्यपालांनी लवकर निर्णय घेणे महाराष्ट्राला अपेक्षित होते. पण तसे न होता उलट राजभवनात विरोधी पक्षनेत्यांचे येणे-जाणे वाढले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी टिप्पणी करत राज्यात हेतुतः राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय घेतला होता. राऊत यांनी तर राजभवन हे राजकीय षडयंत्राचे केंद्र बनू नये अशी अपेक्षा व्यक्त करतानाच घटनात्मक चौकटीबाहेर वागणाऱ्यांना इतिहास कधीही माफ करत नाही, असा इशाराही दिला होता.

याच दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय किंवा पाठवलेला प्रस्ताव घटनात्मकदृष्ट्या राज्यपालांसाठी कसा बंधनकारक आहे, याबाबतचे स्पष्टीकरणही राज्याच्या माजी ऍटर्नी जनरलसह काही घटनातज्ज्ञांनीही दिले होते. मात्र याच दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित करून कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्याचे भाजपचे स्वप्न जाहीर केले होते. एका भाजप कार्यकर्त्याने तर मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु ते तेथे टिकले नाही.

सोमवारी राज्य मंत्रिमंडळाने नव्याने घेतलेल्या ठरावात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत उपस्थित केलेले तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. एकीकडे भाजप महाराष्ट्रात ‘मध्य प्रदेश’ घडवण्याचे स्वप्न पहात आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज भवानतील चकरा वाढल्या आहेत. तर दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर नेमकी काय भूमिका घेऊ शकतात, याचा अंदाज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीला आधीच आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीने पुढची रणनीतीही निश्चित करून ठेवली आहे. त्यात राज्यपालांच्या वेळकाढूपणाला न्यायालयात आव्हान देण्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा नव्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यापर्यंतच्या रणनीतीचाही समावेश आहे.

शरद पवारांसारखे राजकारणात मुरलेले नेतृत्व पाठिशी असणे ही महाराष्ट्र विकास आघाडीची जमेची बाजू आहे. पवार कोणत्या वेळेला कोणती राजकीय खेळी खेळून काय करीश्मा घडवतील,याचा काहीच अंदाज बांधता येत नाही, हे त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवून दाखवून दिले आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेच्या जोरावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची हिरावून घेण्यात आणि देवेंद्र फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न पूर्ण करण्यात कितपत यश येते, हे नजीकच्या काळातच पहायला मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा