संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांच्या शाहूशक्ती-भीमशक्तीचा चालणार ७५ मतदारसंघात करिश्मा!

0
620
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर बहुजन समाजातील हे दोन नेते राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला असून हे दोन नेते एकत्र आलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रातील किमान ७०ते ७५ मतदारसंघात शाहूशक्ती-भीमशक्तीचा करिश्मा चालू शकतो, असेही बोलले जात आहे.

संभाजीराजे- प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट झाल्यानंतर या दोघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसाठी मी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला मात्र त्यांच्याकडे जायचे नाही. खासदार संभाजीराजे यांच्याकडे मी जायला तयार आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती. सध्याच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची आता गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर राजकारणात ताजेपणा येईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या बोलण्यातून संभाजीराजेंशी राजकीय युती करण्याची त्यांची मानसिक तयारी असल्याचेच स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असलेले हे दोन नेत एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर संभाजीराजे यांनी कोणतीही उघडपणे प्रतिक्रिया दिली नसली तरी बहुजन समाज एकाच छताखाली राहील आणि जातीय विषमता कमी होईल, यासाठी ही भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर- संभाजीराजे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि या दोघांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राचे राजकीय चित्र कसे बदलू शकते,याबाबतचे आडाखे बांधण्यासही सुरूवात झाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील मराठा तरूणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले असले तरी मी भाजपचा नाही, असे त्यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी भाजपच्या अधिकृत व्यासपीठावर जाणेही टाळले आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजेंना सध्या तरी कोणतेही ठळक असे ‘राजकीय बॅनर’ नाही आणि त्यांची स्वतःची अशी कुठली संघटनाही नाही. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यांनी केलेले दौरे आणि मराठा समाजाचे हितरक्षण करण्यासाठी दक्ष असलेला नेता अशी प्रतिमा निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न या संभाजीराजेंच्या जमेच्या बाजू आहेत.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नसली तरी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आघाडीत असलेल्या एमआयएमचा एक खासदार औरंगाबादेतून निवडून आला आहे. या दोन्ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जी हवा केली, त्यामुळे भल्याभल्यांची पाचावर धारण बसली होती. प्रकाश आंबेडकर यांची स्वतःची अशी एक व्होट बँकही आता तयार झाली आहे. या व्होट बँकेला थोडासा राजकीय बुस्टर मिळण्याची गरज आहे, तो मिळाला तर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राचे राजकीय चित्र फिरवू शकते आणि महाराष्ट्रात सत्तेवर कोणाला आणायचे यात निर्णायक भूमिका बजावू शकते, असेच एकंदर चित्र आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे यांचे एकत्र येणे महत्वाचे मानले जाऊ लागले आहे.

प्रकाश आंबेडकर- संभाजीराजे यांनी एकत्र येणे राजकीयदृष्ट्या जेवढे महत्वाचे ठरणार आहे, तेवढेच ते सामाजिकदृष्ट्याही महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या दोघांची युती ऐतिहासिक तर ठरेलच, शिवाय त्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक कुसही बदलण्याच्या दिशेने पावले टाकली जाऊ शकतात,असेही जाणकारांना वाटते.

प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत विविध राजकीय प्रयोग केले आहेत. भारिप-बहुजन महासंघाचा त्यांचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी होत असल्याची चिन्हे दिसू लागली असतानाच त्यात फाटाफूट करण्यात आली होती. भारिप-बहुजन महासंघाच्या प्रयोगानंतर वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग उमेदवार निवडून आणू शकला नसला तरी या प्रयोगाने महाराष्ट्रातील वंचितांना राजकीय भान देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर महाराष्ट्रातील किमान ७० ते ७५ विधानसभा मतदारसंघात ते करिश्मा घडवू शकतात, असाही अंदाज आहे. विशेषतः या दोघांचे एकत्र येणे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ- पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकू शकते. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार असून ते एकत्र येण्याच्या नुसत्या चर्चेनेच महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘ताजेपणा’ आणला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा