काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाआघाडीचा मसुदा तयार, रविवारपर्यंत सुटणार सत्तासंघर्षाचा पेच!

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल.काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल आणि पाच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, असे स्पष्ट संकेत महाआघाडीच्या बैठकीनंतर मिळाले आहेत.

0
145

मुंबईः काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत महाआघडीच्या किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाआघाडीच्या मसुद्याला सोनिया गांधींची मंजुरी मिळताच राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच रविवारपर्यंत सुटेल आणि राज्यात लवकरच नवे सरकार अस्तित्वात येईल, असे स्पष्ट संकेत गुरूवारी मिळाले आहेत. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही एकमत झाले आहे.

महाराष्ट्राला स्थिर आणि भक्कम सरकार देण्यासाठी महाआघाडीच्या समन्वय समितीची बैठक गुरूवारी मुंबईत झाली. या बैठकीत महाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर चर्चा करून त्याच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यात आले. हा मसुदा तयार करताना कोणतीही अडचण आली नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या मसुद्याला मंजुरी दिल्यानंतर राज्यात लवकरच नवे सरकार अस्तित्वात येईल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या बैठकीला शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. मात्र, किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यात नेमका कोणत्या मुद्यांचा समावेश करण्यात आला, त्याचा तपशील देण्यास बैठकीला हजर असलेल्या सर्वच नेत्यांनी नकार दिला.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच-दोन्ही काँग्रेसचे एकमतः मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरच भाजपच्या नेतृत्वातील एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यांनी मोठा त्याग केला आहे. त्यांचा सन्मान राखणे आणि स्वाभिमान जिवंत ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. काँग्रेसची मुख्यमंत्रिपदाची मागणी या निव्वळ अफवा आहेत. काँग्रेसला सत्तेतच यायचे नाही तर मुख्यमंत्रिपदाची मागणी आलीच कुठून? त्यांनी सत्तेत यावे, असा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद?: नवाब मलिक यांनी केलेल्या विधानावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होतील आणि काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. पाच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, असे सत्तावाटपाचे सूत्र ठरल्याचे संकते मिळाले आहेत. अर्थात सत्तावाटपाचे नेमके काय सूत्र राहील, हे महाआघाडीने अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. रविवारपर्यंत त्याही बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

पवार- सोनिया भेटीनंतर सत्तावाटपाचे सूत्र कळणार: किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यावरच महाआघाडीने सर्वात आधी भर दिला आहे. आज तो मसुदा अंतिम झाला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीनंतरच राज्यातील सत्तावाटपाचे अंतिम सूत्र जाहीर केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 सूर आणि मनेही जुळलीः या संयुक्त बैठकीचा 24 सेकंदाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून त्यात शिवसेनेचा जाहीरनामाना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रसन्न मुद्रेने चाळताहेत असे स्पष्ट दिसत आहे. त्यावरून तिन्ही पक्षांचे सूर आणि मनेही जुळल्याचे ध्वनित होत असून महाआघाडीची पावले सरकार स्थापनेच्या दिशेने पडत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा