महाआघाडीचे ऐतिहासिक शक्तिप्रदर्शनः तिन्ही पक्षांच्या 162 आमदारांनी घेतली एकजुटीची शपथ

0
96
छायाचित्र: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून साभार .

मुंबई : अजित पवारांना गळाला लावून सरकार स्थापन केलेला भाजप विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्‍वभूमीवर दगाफटका करू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचे आज हॉटेल ग्रँड हयातमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या 162 आमदारांची परेड घेऊन त्यांना पक्षनिष्ठा आणि एकजुटतेची सामूहिक शपथही देण्यात आली आहे. सत्तापेच निर्माण झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या आमदारांना अशा पद्धतीने एकत्रित करून सामूहिक शपथ देण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. आम्ही 162 असा नारा महाविकास आघाडीने दिला आहे.

 राज्यपालांवर दबाव टाकण्यासाठी या तिन्ही राजकीय पक्षांनी एकत्रितपणे ही खेळी खेळल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. मंचावर संविधान ठेवून या आमदारांना एकजूट राहण्याची शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खारगे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना नेते संजय राऊत आदींसह तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षांचे नेतेही यावेळी उपस्थित होते.

 हा महाराष्ट्र आहे, गोवा नव्हे : शरद पवार

 भाजपने बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यांत सत्ता स्थापन केली. पण हा गोवा नाही, महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचे लादाल तर त्याला उत्तर देण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. कोणतीही चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम देत महाविकास आघाडीकडे आज 162 आमदार आहेत. बहुमत चाचणीच्या वेळी यापेक्षाही जास्त मते मिळतील, असे शरद पवार म्हणाले. सुप्रीम कोर्टाचा आदेश येईल, त्यादिवशी बहुमत सिद्ध करण्याची आमची तयारी आहे. आम्ही महिनाभरापूर्वीच आम्ही गटनेतेपदाची निवड केली. पण अजित पवार तिकडे गेले. त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे. त्यांना व्हीपचा अधिकार आहे, अशी भीती नवीन सदस्यांना घातली जात आहे. आदेश देण्याचा अधिकार निलंबित केलेल्या नेत्याला नसतो. ज्यांना सदस्यत्व जाण्याची भीती आहे, त्यांची मी स्वतः जबाबदारी घेतो, अशेही पवार म्हणाले.

 आडवे येण्याचा प्रयत्न करूनच पाहा: उद्धव ठाकरे

हे सगळेआमदार फक्त खुर्च्या उबवण्यासाठी एकत्र आलेले नाहीत. सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्‍या शक्तीला मातीत गाडण्याची सुरूवात आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रापासून करत आहोत. शिवसेना काय आहे, हे पहायचे असेल तर आमची त्याचीही तयारी आहे. आडवे येण्याचा प्रयत्न करायचा असेल तर करूनच पाहा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा