राष्ट्रपती राजवटीची शक्यता आणि राजभवनाची सक्रियताः राजकारणात फक्त दोनच गोष्टींची चर्चा!

0
1168
राज्य़पाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजभवनावर चहापानासाठी निमंत्रित केले होते.

मुंबईः राज्यावर आलेले कोरोनाचे संकट निस्तारणे ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असताना महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून ‘राष्ट्रपती राजवटीची शक्यता आणि राजभवनाची सक्रियता’ या दोनच गोष्टींची चर्चा रंगली आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यात सरकार स्थापन करता येऊ न शकल्याची सल भाजपला कोरोना संकटापेक्षाही मोठी वाटू लागली आहे. त्यामुळे कोरोना संकटाचे निमित्त पुढे करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांचे शासकीय निवासस्थान असलेले राजभवन कधी नव्हे एवढे सक्रीय झाले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासूनच ते अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपकडून विविध पातळ्यांवर होत आहेत. या प्रयत्नांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकाही अनेकदा टिकेचा विषय बनल्या आहेत. कोश्यारी हे घटनात्मक पदावर असूनही भाजपच्या कलानेच वागत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी शासकीय यंत्रणेला परस्पर आदेश देऊन राज्यात दोन सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे केली होती. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाने दोन वेळा प्रस्ताव पाठवूनही राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्यास नकार दिला. विद्यापीठाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षेबाबतही राज्यपाल कोश्यारींनी सरकारच्या भूमिकेच्या विपरित भूमिका घेतली.

हेही वाचाः ‘सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या बातम्यांचा धुरळा ही निव्वळ पोटदुखी!’

आता कोरोना संकटाचे निमित्त पुढे करून राज्यपाल कोश्यारींकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांत राजभवनात राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यपाल कोश्यारींना महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनाच चहापानासाठी बोलावून केलेल्या चर्चेत कोरोनाचे संकट हाताळणे राज्य सरकारला अवघड जात असल्याचा उल्लेख केला. खुद्द राऊतांनीच ही बाब सांगितली.

राऊतांच्या भेटीनतंर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी चहापानासाठी बोलावले. उभयतांत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र बाहेर येऊ शकले नाही. मात्र भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेऊन ठाकरे सरकार बरखास्त करून थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार राज्यपालांची भेट घेतलेली भेट टिकेचा विषय बनल्यामुळे त्यांनीच राणेंना राज्यपालांकडे राणेंना पाठवून राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याचीही चर्चा आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर काल सायंकाळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही ‘मातोश्री’ भेट झाली. दोघांची ही भेट सुमारे दीडतास चालली. राज्यपालांशी झालेल्या चर्चेत शरद पवारांना केंद्र सरकारच्या संभाव्य भूमिकेचा वास आल्यामुळेच त्यांनी ठाकरेंची भेट घेऊन पुढील रणनितीबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. या भेटीमुळेही भाजप केंद्रातील सत्ता आणि राजभवनाचा वापर करून राज्यात ‘पुढचे पाऊल’ टाकण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या सगळ्यात कोरोनाचे संकट आणि त्यावरील उपाययोजनांचा प्रश्न मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संकटापेक्षा भाजपला राज्यातील सत्ता हस्तगत करणे महत्वाचे वाटते काय? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा