फडणवीसांचाही ‘येद्दियुरप्पा’: भाजपचा विधानसभा अध्यक्ष न झाल्यास ‘बहुमता’आधीच देणार राजीनामा

1
411
संग्रहित छायाचित्र

कौशल दीपांकर/ मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने उद्या बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. अवघ्या 30 तासांत बहुमतासाठी लागणाऱ्या 145 आमदारांची जुळवाजुळ झाली नाही आणि विधानसभा अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आला नाही तर बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपच्या येद्दियुरपांनीही असेच केले होते.

संविधान दिनाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे घोडेबाजाराला फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे 30 तासांत बहुमतासाठी लागणारा 145 आकडा जुळवणे भाजपला म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी आधी होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडीवरच भाजपची पुढील रणनीती अवलंबून राहाणार आहे. भाजपचा विधानसभा अध्यक्ष झाला तरच बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि तसे झाले नाही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाताच राजीनामा द्यायचा, अशी भूमिका सध्या भाजपने घेतली आहे.

जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते

अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आहेत, त्यांचा व्हीप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर बंधनकारक राहील,असे भाजपकडून वारंवार सांगितले जात असले तरी जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत गटनेते असल्याची नोंद विधिमंडळ सचिवालयाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. हा भाजपसाठी मोठाच धक्का आहे. असे असले तरी विधिमंडळ गटनेत्याबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत असतात. विधानसभा अध्यक्षपदी भाजपचा नेता निवडून आला तरच नियमांना मुरड घालून विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. अन्यथा महाविकास आघाडीचा विधानसभा अध्यक्ष निवडून आला तर जयंत पाटलांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांना जयंत पाटलांनी जारी केलेला व्हीप बंधनकारक राहील. अशा परिस्थितीत आमदारकी वाचवण्यासाठी अजित पवारांनाही देवेंद्र फडणवीस यांच्या बहुमत चाचणीच्या विरोधात मतदान करावे लागेल.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा