नेम आणि फेमसाठी उचलली जीभ लावली टाळ्याला उचापतीः भाजपच्या पडळकरांवर धनंजय मुंडेंचा वार

0
1088
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असून राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असेल की शरद पवारांवर टीका करायची हे समजून अनेक जण उचलली जीभ लावली टाळ्याला अशा उचापती करतात, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याची अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वस्तरातून निषेध होत असून भाजपनेही पडळकरांच्या वक्तव्यापासून स्वतःला वेगळे केले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असेल की शरद पवारांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील. देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाहीत, ह पहावे. बिरोबा यांना सद्बुध्दी देवो, असे  ट्विट मुंडे यांनी केले आहे.

हेही वाचाः भाजप आमदार पडळकरांच्या वक्तव्यावरून वाद, तोंड काळे करून चोप देण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

मंडल आयोग, नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून शरद पवारांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचे सोने केले हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही. पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात,  याचे वाईट वाटते, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा