परत जायचेच होते तर आले कशाला?: अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
541
संग्रहित छायाचित्र.

पुणेः सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कुणी पुणेकरांनी बोलावले नव्हते. उद्या लोक कामे घेऊन गेली तर सांगतील मी परत जाणार. मग आले कशाला?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 पुण्यात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात चद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार, असे जाहीर केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले होते. त्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पुणे विधान भवनात अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर बोलताना त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले.

निवडणुकीत कुणी कुठे उभे रहावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करू लागले. लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. कोथरुडची कामे व्हावीत ही अपेक्षा आहे. उद्या लोक कामे घेऊन गेली तर मी परत जाणार आहे असे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापूरलाच थांबायचे होते. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावले नव्हते. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले, असे पवार म्हणाले.

भाजपचे आमदार संपर्कात आहेत, असे मी म्हटलेले नाही. काळजी घ्या, तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली, सरकार येणार नाही, आपली कामे होणार नाहीत, यासाठी ते गेले. तिथे कामे होणार नसतील ते परत दुसरीकडे जातील, एवढेच मी म्हणालो होतो. तीन चार महिन्यांत काही गोष्टी घडू शकतात, असे मी म्हटलो त्याचा त्यांना राग आला. इतर पक्षातील आमदार घेताना त्यांना उकळ्या फुटत होत्या. बरं वाटत होते…. आता कसं वाटतंय, तर गार गार वाटू लागले आहे… असेही पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. कोणताही निर्णय घेतला तरी त्यात दोन मतप्रवाह दिसतात. काहीजण निर्णयाचे समर्थन करु शकतात तर काहीजण विरोध करू शकतात. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात आहे. जानेवारीत सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे अजित पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा