नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी, स्थानिक आघाड्यांच्याही विजयाचा झेंडा

0
41
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील १०६ नगर पंचायतींसाठी घेण्यात आलेल्या मतदानापैकी ९७ नगर पंचायतींच्या मतमोजणीचे निकाल हाती आले असून या निकालांचा एकत्रित विचार केल्यास या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. महाविकास आघाडीने ३२ नगर पंचायतींवर आपला झेंडा फडकवला असून भाजपने १८ नगर पंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर ४६ नगर पंचायती स्थानिक आघाड्यांच्या ताब्यात गेल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींची मतमोजणी उद्या (मंगळवारी) होणार आहे.

नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सबंध राज्याचे लक्ष लागले होते. निकाल जाहीर झालेल्या नगर  पंचायतींपैकी भाजपने १८, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १२ आणि पक्षनिहाय पक्षीय बलाबलाचा विचार करता या निवडणुकीत भाजपने ३८४, राष्ट्रवादी काँग्रेसने ३४४, काँग्रेसने ३१६ तर शिवसेनेने २८४ जागा जिंकल्या आहेत. तर स्थानिक आघाड्यांचे ३१४ सदस्य या निवडणुकीत निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१७ मध्ये नगर पंचायतीत शिवसेनेचे २०१ सदस्य होते. यावेळी ही सदस्य संख्या २८४ वर गेली आहे.

 या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात १८, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी १२ आणि शिवसेनेच्या ताब्यात ९ नगर पंचायती गेल्याचे सध्याचे चित्र आहे. स्थानिक आघाड्यांच्या ताब्यात ४६ नगर पंचायती गेल्या आहेत. उद्या मंगळवारी याबाबतचे आणखी स्पष्ट राजकीय चित्र समोर येईल.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्याचे सर्वच रिपोर्ट वाचा एका क्लिकवर

नंबर वनवरून दावे- प्रतिदावेः

राष्ट्रवादी काँग्रेसः राज्यातील नगर पंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याबद्दल जयंत पाटील यांनी मतदारांचे आभारही मानले आहेत. पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, असे पाटील म्हणाले.

 भाजपः राज्यातील नगर पालिका, नगर पंचायती, तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या असून पुन्हा एकदा भाजपच नंबर वन असल्याचे सिद्ध झाले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केला आहे. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगर पालिका, नगर पंचायतींवर भाजपची सत्ता असेल, असेही ते म्हणाले. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आहे, त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा