निलेश राणेंच्या ‘साखर’ टिकेला उत्तर देताना रोहित पवारांनी वापरला ‘कोंबडी’च्या संदर्भाचा मसाला!

2
2535
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रावरून टीका करणाऱ्या माजी खासदार निलेश राणेंना राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ‘कोंबडी’ची आठवण देत जोरदार टोला लगावला आहे. ‘साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सूचवल्या आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. निलेश राणेंनी ‘साखरे’वर केलेल्या टिकेला रोहित पवारांनी ‘कोंबडी’ने उत्तर दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली असून अनेक जण ‘राणे आणि कोंबडीचा संबंध तुम्हाला माहीत आहे का?’ अशी विचारणा करू लागले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या उद्योगाच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी करणारे पत्र शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. त्यावर टीका करताना निलेश राणे यांनी ‘साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने कोरोडोंची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंवर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??’ असे ट्विट केले होते. राणेंच्या या ट्विटला रोहित पवार यांनी अतिशय सौम्य पण रोख’ठोक’  उत्तर दिले आहे.

‘मी आपणास सांगू इच्छितो की, शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सूचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्याने पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी’ असे सौम्य पण खोचक ट्विट करून रोहित पवारांनी कुक्कुटपालनाचा संदर्भ देत ‘कोंबडी’च्या आठवणी ताज्या केल्यामुळे सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मिडीयावर ही चर्चा रंगल्यानंतर कोंबडी आणि राणेंचा संबंध कोणाला माहीत आहे का? अशी विचारणा सुरू झाली.

विशेष म्हणजे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी १९ हजार आठ मतांनी पराभव केल्यानंतर शिवसैनिकांनी हातात ‘कोंबड्या’ घेऊन विजयाचा जल्लोष केला होता. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ८ ऑक्टोबर २०१७ रोजी रत्नागिरी येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना ‘शिवसेनाप्रमुखांनी कोंबडी चोर म्हणून नाव ठेवलेले राणे तुमच्याकडे येत आहेत, तेव्हा भाजपवाल्यांनो  तुमच्या कोंबड्या सांभाळा’ अशी बोचरी टीका केली होती.

निलेश राणेंचा तोल सुटलाः रोहित पवार यांच्या या उत्तरावर निलेश राणे यांचा तोल सुटला आणि चांगलेच खवळले. त्यांनी टिकेची पातळी सोडली आणि अरे तुरेची भाषा वापरत ‘मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिर्ची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक टाकू नकोस. नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी.’ असे ट्विट निलेश राणेंनी केले. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी रोहित पवारांचा उल्लेख ‘शेंबडे’ ‘ वांग्या’ असा केला.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा