राजभवन ‘राजकीय षडयंत्रा’चा अड्डा बनू नयेः संजय राऊतांचा राज्यपालांवर अप्रत्यक्ष घणाघात

0
82
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून दहा दिवस उलटले तरी त्यांनी  या प्रस्तावावर अद्याप स्वाक्षरी केली नाही. राज्यपालांच्या या भूमिकेवर आता महाविकास आघाडीतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या असून राजभवन राजकीय षडयंत्रांचा अड्डा बनू नये, जे घटनाबाह्य वर्तन करतात, त्यांना इतिहास कधीच माफ करत नाही, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेताना ते विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एकाही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे एप्रिलमध्ये होऊ घातलेली विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे ९ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय झाला. तसा प्रस्ताव त्याच दिवशी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्याला आता दहा दिवस उलटले तरी या प्रस्तावावर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारीमध्ये दोन नावांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्या प्रस्तावालाही राज्यपाल कोश्यारी यांनी मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत आज दोन ट्विट करून राज्यपाल कोश्यारी यांचे नाव न घेता घणाघाती हल्ला चढवला आहे. राजभवन, राज्यपालांचे निवासस्थान हे राजकीय षडयंत्रांचा अड्डा बनू नये. लक्षात ठेवा, जे घटनाबाह्य वर्तन करतात त्यांना इतिहास कधीच माफ करत नाही, असा इशारा राऊत यांनी इंग्रजी ट्विटमध्ये दिला आहे. याच संदर्भात त्यांनी मराठीतूनही ट्विट केले आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा कापी है!, असे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची तक्रार केली होती.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही विरोधकांवर घणाघाती हल्ला केला आहे. आपल्या हातात सत्ता नाही म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. नैराश्यापोटी ते सरकारविरोधी हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लोकांमध्ये जावून काम करत आहेत. लोकांचा सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे भाजपचे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. सरकार खंबीर आहे, १५ वर्षे टिकणार!,  असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राऊतांना अचानक आठवलेले निर्लज्ज राज्यपाल रामलाल कोण?- संजय राऊतांनी ‘का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे’ असे एका ट्विटमध्ये म्हटल्यामुळे हे रामलाल नावाचे राज्यपाल कोण?  असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

ठाकूर रामलाल हे १५ ऑगस्ट १९८३ ते २९ ऑगस्ट १९८४ पर्यंत आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. त्यावेळी आंध्र प्रदेशात एन. टी, रामाराव यांचे स्पष्ट बहुमताचे सरकार होते. मुख्यमंत्री एन. टी. रामाराव हे ह्रदय शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेलेले असताना रामलाल यांनी त्यांचे स्पष्ट बहुमतातील सरकार बरखास्त करून तत्कालीन अर्थमंत्री एन. भास्कर राव यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली होती. भास्कर राव यांच्याकडे केवळ २० टक्के आमदारांचे संख्याबळ होते. अमेरिकेहून परतल्यानंतर एन. टी. रामाराव यांनी रामलाल यांना भेटून तुमचा निर्णय अन्यायकारक आहे, मी बहुमत सिद्ध करायला तयार आहे, असे सांगितले. परंतु रामलाल यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे रामाराव हे राज्यपालांविरुद्ध थेट रस्त्यावर उतरले. आंध्र प्रदेशात निर्माण झालेला रोष पाहून तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यांनी रामलाल यांना राज्यपालपदावरून तडकाफडकी हटवले आणि शंकरद्याल शर्मा यांची राज्यपालपदी नियुक्ती केली. पदभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल शर्मा यांनी पुन्हा एकदा आंध्र प्रदेशची सत्ता एन. टी. रामाराव यांच्याकडे सोपवली होती. घटनाबाह्य वर्तनामुळे रामलाल यांना अपमानास्पदरित्या राज्यपालपदावरून दूर व्हावे लागले होते. संजय राऊत यांनी आज अचानक रामलाल यांची आठवण काढून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नाव न घेता थेट इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा