फडणवीसांचा हिशेब चुकता करण्यासाठी ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?

0
213
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एककल्ली कारभारावर शरसंधान करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे फडणवीसांनी त्यांच्यावर गेली पाच वर्षे केलेल्या अन्यायाचा हिशेब चुकता करायला सज्ज झाले असून ते शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीसांचे साडेतीन दिवसांचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचा बुधवारी शपथविधी झाला. त्यावेळी खडसे यांनी फडणवीसांवर थेट हल्लाबोल केला होता. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्यामुळेच भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. माझ्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता यांची तिकिटे कापली. आम्हाला सोबत घेतले असते तर भाजपच्या 20-25 जागा नक्कीच वाढल्या असत्या, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या एककल्ली कारभारावर टिकास्त्र सोडले आणि त्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातच एकनाथ खडसे हे आमच्या कायम संपर्कात असतात, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. भोसरी भूखंड गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खडसेंना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कधीच मंत्री होऊ दिले नाही. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकिट कापून घडी घालण्याचा प्रयत्न केला होता. भाजपने त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्येला मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून खडसे भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाराष्ट्र विकास आघाडी केवळ राज्यात सरकार स्थापन करण्यापुरतीच नसून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढवणार आहे. या बलाढ्य आघाडीपुढे एकट्या भाजपचा टिकाव लागणे अवघड दिसू लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांना आपल्या भागातील वर्चस्व कायम राखणे आणि कार्यकर्ते सांभाळणेही अवघड जाईल, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळेच खडसे वेगळा विचार करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळेच ते महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते शिवसेनेत गेले तर त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करून शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा