खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेशः फडणवीस म्हणतात तसेच घडणार की भाजपला भगदाड पडणार?

0
880
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः तब्बल चाळीस वर्षे योगदान देऊन भाजपच्या विस्तारात मोठी भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन वाजता राज्याच्या राजकारणात घडणारी ही मोठी घडामोड असून खडसेंसोबत भाजपचे कोण कोण नेते राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आणि खडसेंच्या पक्षप्रवेशाचा आजचा मुहूर्तही सांगितला होता.

खडसेंच्या सीमोल्लंघनासोबतच भाजपचे १० ते १२ विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला होता. मात्र पक्षांतरबंदी कायद्याच्या अडचणीमुळे हे आमदार लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचाः खडसेंचा दोन ओळींचा राजीनामा भलताच चर्चेत, शुद्धलेखनाच्या चुकांवरून ब्राह्मण्य- बहुजन चर्चा!

खडसेंनीही काल मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याचा पुनरूच्चार केला होता. मात्र भाजपचे १५ ते १६ माजी आमदार आपल्यासोबत आहेत आणि पक्षप्रवेशाच्या वेळी तेही मुंबईत सोबत असणार आहेत, असे खडसेंनी स्पष्ट केले होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील किती नेते आणि समर्थक खडसेंसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याची उत्सूकता राज्याच्या राजकारणाला लागलेली आहे.

हेही वाचाः मोदींच्या व्हिडीओवर डिसलाइक्सचा पाऊस, बंद करावे लागले लाइक-डिसलाइकचे ऑप्शन!

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलाच हादरा बसेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. धुळ्याचे अनिल गोटे हे आधीच भाजपला जयश्रीराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. खडसे-गोटे जोडीमुळे धुळ्यातील भाजपचे राजकीय गणित बिघडणार असाही अंदाज बांधला जात आहे. दुसरीकडे भाजपच्या ताब्यात असलेल्या अनेक स्थानिक स्वराज संस्थाही राष्ट्रवादीच्या ताब्यात जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

आज खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांचे किती पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. खडसे हे कालच सहकुटुंब मुंबईत दाखल झाले आहेत. आज त्यांचे समर्थकही मुंबईत दाखल होत आहेत.

हेही वाचाः राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपकडून कोरोनाचे राजकारणः बिहारी जनतेला मोफत लसीचे आमिष

खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले तरीही त्यांच्यासोबत भाजपचा कुणीही नेता जाणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला होता. त्यामुळे फडणवीस म्हणतात तसे खडसेंसोबत कुणीही जाणार नाही की, भाजपला मोठे भगदाड पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा