भाजपकडे अडीच वर्षेच मागणाऱ्या शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची लॉटरी, विरोधातच बसू म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद?

0
539
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ दिला नाही म्हणून एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेला नव्या महाआघाडीत पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार असून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, त्यामुळे आम्ही विरोधातच बसू असे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच गृहमंत्रिपदाचीही लॉटरी लागणार आहे. प्रारंभी शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हायला कचरत असलेल्या काँग्रेसनेही सत्तेत सहभागी होण्याची तयारी केली असून काँग्रेसला विधानसभाध्यक्षपद मिळणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेच्या नव्या महाआघाडीत असे सत्तावाटप निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नवी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना भेटल्यानंतर सत्तावाटपाचे हे सूत्र जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची संयुक्त बैठक गुरूवारी मुंबईत झाली. या बैठकीत नव्या महाआघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्याचबरोबरच सत्तावाटपाचे सूत्रही ठरवण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदासाठीच शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याने त्यांचा सन्मान राखायचा म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद ठेवण्याच्या मुद्यावर सहमत झाले. काँग्रेसही सत्तेत सहभागी होण्यास राजी झाली असून काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच विधानसभा अध्यक्षपद आणि महसूल खातेही मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद दिले जाईल. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 14 मंत्रिपदे आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळणार आहेत. अर्थ व नगरविकास खाते शिवसेनेकडेच रहाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. नव्या महाआघाडीचे सर्व व्यवस्थित जुळून यावे आणि सरकार स्थापनेत कुठलाही खोडा घातला जाऊ नये म्हणून तिन्ही पक्षांकडून किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपाच्या सूत्राबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदाच्याच मुद्यावर भाजपशी असलेले 30 वर्षांचे ऋणानुबंध तोडून टाकून शिवसेनेने पारंपरिक राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला दोस्ताना राजकीयदृष्ट्या चांगलाच फायदेशीर ठरू पहात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा