उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून घेणार गुरूवारी सायंकाळी 6.40 वाजता शपथ

0
51

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले असून ते गुरूवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी मुंबईच्या दादर येथील शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची म्हणजेच 3 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुंबईच्या हॉटेल ड्रायटंडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, सुभाष देसाई आणि अन्य प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचा दावा मान्य करून राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. तसे लेखी पत्रही राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाने जारी केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आपण महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य होणे आवश्यक आहे, असेही राज्यपालांनी या पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक आदेश ट्विटर हॅण्डलरवर अपलोड करणाऱ्या @maha_governor या ट्विटर हॅण्डलरवर हे पत्र अपलोड करण्यात आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा